नमस्कार! मी MBBS पूर्ण करून मी सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MD Radiology चा अभ्यास करत आहे. मी श्री तिलोक जैन विद्यालयात इ. ५वी ते इ. १०वी पर्यंत चे शिक्षण २००५-२०१० च्या दरम्यान घेतले. त्यानंतर मी उच्च माध्यमिक शिक्षण पुणे येथे घेतले व NEET UG परीक्षेमधून (State Rank २४६) माझी B.J. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे MBBS करण्यासाठी निवड झाली. पाथर्डी सारख्या छोट्या गावातून इथपर्यंतचा माझा प्रवास नक्कीच रोमांचक राहिला आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण आपल्या बालपणी होते व माझा हाच पाया माझ्या शाळेने खंबीर रचला असे मला वाटते. चांगले माध्यमिक शिक्षण हा आपल्या करिअरचा पाया आहे. मी त्यासाठी STJVP मध्ये होते यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. या शाळेत मला विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत झटणारे, त्यासाठी नवनवीन क्लुप्त्या शोधणारे गुरुजन मिळाले. त्यांनी नुसते पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कसे जपावे,मोठी स्वप्नं पाहावीत, त्यासाठी अमर्याद कष्ट करावेत, असे संस्कार आम्हावर केले. माझ्या सामाजिक जाणिवाही इथेच जागरूक झाल्या. त्याबद्दल मी माझ्या गुरुजनांची सदैव ऋणी आहे. या शाळेनेच मला जिवलग मैत्री शिकवली. विविध उपक्रम जसे की विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांमुळे मनाला चालना मिळाली. मला अजूनही आठवण येते ती शाळेच्या लायब्ररीची. तिथे मला पुस्तकरूपी मार्गदर्शक मित्र मिळाले आणि आमची गट्टी छान जमली. इ. ६वीत प्रज्ञाशोध परीक्षा, ७वी ची स्कॉलरशिप, MTSE, ८वी ची NTSE या स्पर्धा परीक्षांसाठी शाळेने खूप तयारी करून घेतली. या स्पर्धा परीक्षांमुळे मन तल्लख होते. या स्पर्धांच्या अनुभवामुळेच पुढे NEET UG आणि PG (National Rank १५८४, State Rank १२२) सारख्या करिअर ठरवणाऱ्या परीक्षांचा अभ्यास करणे सुकर झाले. या शाळेत शिकायला मिळाले हे मी माझे भाग्य समजते. आणि या मनोगताच्या निमित्ताने माझे सर्व गुरुजन, शाळेचे कार्यकर्ते, संस्थापक यांना मनोमन प्रणाम करते.मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद!
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.