प्राचार्य मनोगत


Shri ASHOK DAUND (M.Sc.,B.Ed.,D.S.M.)

      “ उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्ट पूर्ती कडे होणारी वाटचाल म्हणजे यश ” आणि हे मिळविण्यासाठी विद्यार्थी श्री तिलोक जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतात. विद्यार्थ्यांनी समोर ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी विद्यालयात त्यांचे मन ,मेंदू व मनगट बळकट केले जाते . त्यांच्यामध्ये अत्युच्च यश प्राप्त करण्याची हिंमत निर्माण केली जाते आणि त्या मधूनच विद्यार्थ्यांना सुंदर जीवन जगण्याची आकांक्षा निर्माण होते. वृक्ष बळकट होण्यासाठी त्यांच्या मुळांना जसे खोल जमिनीमध्ये जावे लागते तसे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा पाया सखोल व मजबूत असावा लागतो. तो मजबूत करण्याचे कार्य येथे केले जाते. येथे मिळवलेल्या ज्ञानामुळे कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते . हे या विद्यालयाचे वेगळेपण आहे. विद्यार्थ्यांना मिळणारे योग्य मार्गदर्शन आणि त्यांनी केलेले कष्ट हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.

      विद्यालयातील शिक्षकांमध्ये असलेला सकारात्मक दृष्टीकोन , वेळेचे योग्य नियोजन व काम करण्याची अचूक पद्धती , ज्ञानदानाची दूर्दम्य इच्छाशक्ती या मुळे विद्यालयामध्ये दैनंदिन वातावरण हे आनंददायी , उत्साही व प्रोत्साहनयुक्त असते . परिणामतः विद्यार्थ्यांची प्रगती व दिवसेंदिवस वाढत चाललेली गुणवत्ता हेच विद्यालयाचे बलस्थान होय. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी , विविध प्रश्न हे विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील सुसंवादाने विचार विनिमयाने सोडवले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक नवा दृष्टीकोन मिळतो . विद्यार्थी गरुड झेप घेतात, त्यांच्या पंखामध्ये उंच भरारी घेण्याचे बळ येते. येथे मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीमुळे ते उच्च यशाकडे वाटचाल करतात.

      एकूणच ज्ञानरुपी अथांग सागरामध्ये आजचे विद्यार्थी राजहंस बनून मनसोक्तपणे विहार करत असतात. त्यांचा शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास करण्यामागे विद्यालयातील अनुभवी, तज्ञ, गुणवंत व नवनवीन कल्पनाशक्ती असणाऱ्या अध्यापकांची महत्वाची भूमिका आहे. विद्यार्थी केंद्रित विविध उपक्रम व त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती हे विद्यालयाचे मुख्य ध्येय आहे. आज मोठमोठया पदावर असणारे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी या सर्व बाबींचे प्रमाण आहे . राष्ट्रसंत , प. पू. १००८ श्री आनंदऋषिजी म. सा. यांच्या प्रेरणेने , संस्थेचे सचिव सन्माननीय श्री सतिशजी गुगळे व सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्यातील समन्वयामुळे हा वटवृक्ष दिवसेंदिवस मोठा होत आहे या विषयी तिळमात्र शंका नाही . शेवटी एवढेच लिहावेसे वाटते.

|| पढमं णाणं तओ दया ||

Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.