ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून स्वर्गीय ज्ञानरत्नाकर, शिक्षाप्रेमी, पूज्यपाद श्री रत्नऋषिजी म.सा साहेब यांचे सत्प्रेरणेने व स्व. श्री. मोतीलालजी गुगळे , स्व. श्री. उत्तमचंदजी मुथ्था , स्व. श्री. मगनमलजी गांधी यांचे पुढाकाराने ३ जून १९२३ रोजी श्री तिलोक जैन विद्यालयाची स्थापना झाली . गोरगरीब , गरजू मुलांना शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने सुरु झालेले हे विद्यालय आजही निरंतरपणे आपल्या उद्दिष्टावर वाटचाल करीत आहे . केवळ ९ विद्यार्थ्यांवर सुरु झालेल्या या विद्यालयात आज हजारो विद्यार्थी ज्ञानग्रहण करीत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या शाळेच्या विकासामध्ये प. पू. राष्ट्रसंत १००८ श्री आनंदऋषिजी म. सा . यांचे कृपाशीर्वाद , मौलिक मार्गदर्शन लाभलेले आहे .
या विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक श्री गोविंदराव सिताराम वराडे हे अतिशय त्यागी , विद्वान शिक्षक होते . सर्व विषय तेच शिकवीत तसेच धार्मिक शिक्षणही देत . केवळ ९ विद्यार्थ्यांवर सुरु झालेल्या शाळेची विद्यार्थी संख्या ७ महिन्यांतच ३५ झाली. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कै. कुंदनमलजी फिरोदिया यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली . शाळेचे कामकाज पाहून खूप प्रसन्नता व्यक्त केली. लवकरच विद्यार्थी संख्या ६३ वर गेली .
३० / ०४ / १९२७ रोजी शाळेची विद्यार्थी संख्या १२८ वर गेली . नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षकांची संख्या ७ वर गेली. मराठी बालवर्गापासून ७वी पर्यंत इंग्रजी शिकविण्यात येवू लागले. शिवाय जिल्हा लोकल बोर्डामार्फत चालविले जाणारे इ. १ ली ते इ. ४ थी पर्यंतचे वर्ग सुरु केले . राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्ध्याचा हिंदी परीक्षांचा अभ्यास शिकविण्यात येवू लागला . बालवाचनालय, जैन धार्मिक परीक्षा बोर्ड पाथर्डी अभ्यासक्रम आदी उपक्रम सुरु झाले. परीक्षांचे निकाल समाधानकारक येवू लागले. कै . कुंदनमलजी फिरोदिया , उत्तमचंदजी बोगावत , सोसायटी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शंकरराव नवाथे, किसनदासजी मुथ्था इ. तज्ञ मंडळी वार्षिक परीक्षा घेत. शिक्षण खात्यातील ज्येष्ठ अधिकारी शाळेला भेट देत असत व समाधानकारक असा शेरा देत असत. अशा प्रकारे शाळेची भरभराट होऊ लागली .
सन १९४९ मध्ये इ. ८ वी ते इ. ११ वी पर्यंतच्या शाळेला सरकारची मान्यता मिळाली . शाळेसाठी गावाबाहेर सुंदरशी इमारत बांधण्याचे ठरले व तत्कालीन संस्थेचे ट्रस्टी भाऊसाहेब फिरोदिया यांच्या हस्ते , श्री अमोलकचंदजी सुरपुरीया यांचे अध्यक्षतेखाली व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या इमारतीचा पायाभरणी व कोनशिला समारंभ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . वेगाने काम सुरु झाले . १९४८ साली विद्यार्थी संख्या १३८ होती , १९५० साली १९७ , १९५३ साली २६५. अशी भरभराट होवू लागली. १९५१ साली एस .एस. सी परीक्षेत १७ विद्यार्थी बसले पैकी १३ उत्तीर्ण झाले. १९५८ साली तर एकूण विद्यार्थी ३७५ झाले. शिवाय एस. एस. सी परीक्षेचा निकाल ९० टक्के लागला. श्री पी. पी . मेहेंदळे त्या काळातील अतिशय कडक शिस्तीचे , विद्वान गृहस्थ मुख्याध्यापक म्हणून लाभले . या विद्यालयाच्या गौरवशाली इतिहासात मेहेंदळे सर व मेहेंदळे बाई यांचे खूप मोठे योगदान आहे . प्रयोगशील , शिस्तप्रिय दांम्पत्य म्हणून त्यांनी सर्वत्र आपली ओळख निर्माण केली .
विद्यार्थी बोर्ड परीक्षेत चमकू लागले , विविध परीक्षेत यश मिळवू प्रावीण्य मिळवू लागले. वक्तृत्व, खेळ, व्यायाम , योगासने , एन.सी. सी , गर्ल गाईड आदी उपक्रम होवू लागले . विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनविणे व समाजात त्यांच्या पायावर उभे करणे, स्वयंभू बनविणे असा निर्णय संस्थाचालकांनी घेतला . “ निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेची फळ ” या उक्तीस अनुसरून सरकारी दरबारी प्रयत्न सुरु झाले . टर्निंग , फिटिंग , WELDING, MOLDING , कारपेंटरी इ. विषयाचे मशिनरीसाठी ३ ते ४ लाख रु. व तेवढेच इमारतीसाठी जमविणे , विनाअनुदान तत्वावर टेक्निकल हायस्कूल चालवणे हे एक दिव्यच होते . परंतु आचार्य भगवंतांच्या आशीर्वादाने सर्व शक्य झाले. टेक्निकल शिक्षण देणारे त्या वेळी हे एकमेव विद्यालय होते .
अशा प्रकारचा विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख हा आजपर्यंत वाढतच चाललेला आहे . आज विद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा मा . श्री. अशोक दौंड हे सांभाळत आहेत. त्यांची विद्यार्थ्यांविषयी असलेली तळमळ अत्यंत उल्लेखनीय आहे. आज विद्यालयाचे विद्यार्थी प्रतिवर्षी विविध स्पर्धा परीक्षा, विविध क्रीडा प्रकार ,इ. १० वी , इ. १२ वी च्या परीक्षा , यांत राष्ट्रीय स्तरापर्यंत प्रावीण्य मिळवत आहेत. आखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावे , विज्ञान नाट्योत्सव , इन्स्पायर अवार्ड , विज्ञान प्रदर्शन ,एन.सी.सी, गर्ल गाईड , एन.टी.एस, एम.टी.एस., डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा ,शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान गणित अध्यापक संघाचे विविध उपक्रम इ. शेकडो उपक्रम विद्यालयात राबवले जात आहेत . सुसज्ज ग्रंथालय , प्रयोगशाळा , भव्य इमारती , डिजीटल वर्ग , भव्य क्रीडांगण , संपूर्ण संगणकीकृत कामकाज , संगणक प्रयोगशाळा , ई ऑफिस इ. कितीतरी जमेच्या बाजू आहेत.
केवळ उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी संख्या आज हजारोंच्या घरात आहे. समाजातील गोरगरीब होतकरु मुलांना नीट , जेईई , सीईटी यांसारख्या परीक्षांचे मार्गदर्शन या ठिकाणी दिले जाते . आज विद्यालय प्रगतीच्या शिखरावर विराजमान आहे . संस्थेचे सचिव मा. श्री. सतिशजी गुगळे व त्यांचे सर्व सहकारी, प्राचार्य मा. श्री. अशोक दौंड यांच्या शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी धोरणामुळे विद्यालय आज यशाच्या सर्वोच्च शिखरावर असून ग्रामीण भागासाठी तर हे विद्यालय शिक्षणक्षेत्रात संजीवनीचे कार्य करतेय . या विद्यालयातील हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर विराजमान आहेत ही विद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह बाब आहे. अशा प्रकारे हे विद्यालय भविष्यात पूज्य गुरुदेव,आचार्य सम्राट, प.पू.श्री आनंदऋषिजी म. सा. यांच्या आशीर्वादाने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करेल यात तिळमात्र शंका नाही .
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.