श्री तिलोक जैन माध्यमिक विद्यालयास सन १९७५ मध्ये उच्च माध्यमिक वार्गांसाठी सरकारची मान्यता मिळाली. उच्च माध्यमिक स्तरावर विज्ञान शाखेत मान्यता मिळालेले हे तालुक्यातील प्रथम उच्च माध्यमिक विद्यालय आहे. यापूर्वी पाथर्डी तालुक्यात आणि शेजारील तालुक्यांमध्ये उच्च माध्यमिक स्तरावर विज्ञान शाखेत शिक्षण घेण्याची सोय नव्हती. या उच्च माध्यमिक विद्यालया मुळे पाथर्डी तालुक्यातील तसेच शेवगाव, आष्टी , जामखेड इत्यादी तालुक्यातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली. अतिशय कडक शिस्तीचे आणि अभ्यासू शिक्षक उच्च माध्यमिक विभागास लाभले. उच्च माध्यमिक विद्यालय नावारूपास येण्यामध्ये सर्वांचे मोलाचे योगदान आहे . १९७५ पासून उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख आजपर्यंत वाढतच चाललेला आहे आज उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा याच विभागातील माननीय श्री अशोक दौंड हे सांभाळत आहेत. त्यांची विद्यार्थ्यांविषयी असलेली तळमळ अत्यंत उल्लेखनीय आहे. आज उच्च माध्यमिक विद्यालयात एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जीवशास्त्र -गणित,जीवशास्त्र- मानसशास्त्र, मानसशास्त्र- गणित आणि द्विलक्षी- विज्ञान शाखेतील इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल मेंटेनन्स आणि कॉम्प्युटर सायन्स विषय गटांमध्ये शिक्षण घेण्याची संधी या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.
समाजातील होतकरू मुलांना नीट, जेईई, सीईटी यासारख्या परीक्षांचे मार्गदर्शन या ठिकाणी दिले जाते. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना हे उच्च माध्यमिक विद्यालय नेहमीच आपले वाटले आहे. तेथील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन डॉक्टर्स, इंजिनिअर्स झाले आहेत. विद्यालयाचा नियोजनबद्ध "श्री आनंद पॅटर्न "हा गुणवत्ता वाढविणारा पॅटर्न राबविला जातो. विषय शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडून घेणे त्याचे फळ म्हणजे इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थी उज्जवल यश संपादन करत आहेत. विज्ञान गणित प्रदर्शनांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. विज्ञान प्रदर्शनामध्ये उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय स्तरापर्यंत यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास व्हावा यासाठी IISER सारख्या संस्थांना विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित करण्यात येतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शालेय शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम उच्च माध्यमिक विद्यालयात राबविले जातात.
आरोग्य, स्वच्छता याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक उच्च माध्यमिक विद्यालयात निमंत्रित केले जातात. विविध राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धांमध्ये उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केली जाते.पूरग्रस्त ,भूकंपासारख्या आपत्तीच्या वेळी विद्यार्थ्यांनी स्वकमाईतून देणगी दिलेली आहे. रक्षाबंधन हा कार्यक्रम उच्च माध्यमिक विद्यालयात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक सुखदुःखात सहभागी होण्याची परंपरा या उच्च माध्यमिक विद्यालयात आहे. उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांमध्ये असलेला सकारात्मक दृष्टीकोन, वेळेचे योग्य नियोजन आहे. विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व , शिस्त लागावी म्हणून शाळेमध्ये थम सिस्टीम राबवली जाते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा आहे.
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.