सचिव मनोगत


Shri SATISHJI GUGALE (B.Com.)

|| इवलेसे रोप लावियले द्वारी,
त्याचा वेलू गेला गगनावरी ||

      या ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे ९७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री जैन ज्ञान फंड या नावाने स्थापित पाठशाळेचे आज श्री तिलोक जैन विद्यालयात रुपांतर झाले असून हे विद्यालय शताब्दीकडे वाटचाल करीत आहे याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे . श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालय हे केवळ नगर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक नामवंत शैक्षणिक संकुल म्हणून नावारुपास आलेले आहे . शैक्षणिक संकुल हे केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक संकुल असते. उत्तम नागरिक तयार करून तो समाज प्रवाहात सोडण्याचा एक महत्त्वाचा स्त्रोत असते . देशातील समाजाची जडणघडण या स्त्रोताच्या शुचितेवर अवलंबून असते . केवळ साध्याचा विचार न करता साधनांची शुचिता पारखून घेतली पाहीजे या राष्ट्रपिता म. गांधींच्या विचार प्रणालीचा धागा आजपर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्यात दिसतो. तीच साध्य साधन शुचिता कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न आजही या विद्यालयात सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने केला जात आहे .

      विद्यालयात आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर्व सोईंनी युक्त इमारत , अत्याधुनिक प्रयोगशाळा , संगणक प्रयोगशाळा , अनुभवी अध्यापक वृंद , डिजीटल वर्ग, नीट, जेईई , सीइटी इ. सारख्या परीक्षांचे मार्गदर्शन इ. कितीतरी जमेच्या बाजू सांगता येतील . आज विद्यालय यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान असून विद्यालयाचे विद्यार्थी प्रतिवर्षी राज्य , राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धा प्रकारामध्ये देदीप्यमान यश मिळवत आहेत. या सर्व बाबींचा आम्हाला अतिशय सार्थ अभिमान वाटतो. विज्ञान प्रदर्शन , इन्स्पायर अवार्ड योजना , एन.सी.सी , एम.सी.सी , गर्ल गाईड , नवोदय , स्कॉलरशिप , एन.टी एस , एम.टी एस , अवांतर स्पर्धा परीक्षा , क्रीडा स्पर्धा यासह नृत्य , नाट्य , संगीत इ. क्षेत्रातही विद्यालयाचा लौकिक कायम राहिलेला आहे. या सह विद्यालयातील हजारो माजी विद्यार्थी आज देशातील विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.

      जगाने २१ व्या शतकात पदार्पण केलेले आहे. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यांचे एक वेगळेच तत्वज्ञान निर्माण झाले आहे. या नवीन तंत्रज्ञानाचे व तत्वज्ञानाचे बोट धरून पुढील वाटचाल करावी लागणार आहे. याचे पूर्ण भान या विद्यालयातील कर्मचाऱ्यांना आहे, या साठी काळानुरूप हव्या असलेल्या सुविधा शाळे मधून उपलब्ध करून देण्यासाठी संस्थाचालकांचा सदैव प्रयत्न असतो. गोर, गरीब, गरजू मुलांना शिक्षण मिळावे, ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सुरु झालेले हे विद्यालय आजही निरंतरपणे आपल्या उद्दिष्टानुसार निरंतर वाटचाल करत आहे.

      विद्यार्थी , पालक , शिक्षक , संस्थाचालक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाशिवाय शिक्षणक्षेत्रात कोणतेही सर्वोच्च यशस्वी कार्य होवू शकत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे . मला निश्चितपणे खात्री आहे , विद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक दौंड , त्यांचे सर्व सहकारी , सर्व विद्यार्थी व पालक निश्चितपणे या विद्यालयाला नेवून बसवतील त्या स्थानावर जेथे विद्यालयाचे अढळपद असेल......!

|| पढमं णाणं तओ दया ||

Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.