अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी हा तालुका निसर्ग निर्मित असा डोंगराळ,सततचा दुष्काळी, अविकसित असा तालुका आहे.आर्थिकदृष्ट्या मागासलेला हा तालुका;मात्र शैक्षणिकदृष्टया विकसनशील असा आहे. स्वर्गीय ज्ञानरत्नाकर , शिक्षाप्रेमी , पूज्यपाद श्री रत्नऋषीजी म.सा. साहेब यांचे सत्प्रेरणेने व स्व. श्री. मोतीलालजी गुगळे , स्व. श्री. उत्तमचंदजी मुथ्था , स्व. श्री. मगनमलजी गांधी यांचे पुढाकाराने ३ जून १९२३ रोजी स्थापन झालेली श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ, पाथर्डी ही संस्था अनेक संकटांवर मात करत “ दिन दुनी रात चौगुनी ” या उक्तीनुसार शताब्दीकडे वाटचाल करीत आहे. १९७३ साली सुवर्ण महोत्सव,१९८३ साली हिरक महोत्सव, १९९९ साली अमृत महोत्सव साजरा करीत २०२३ साली शताब्दीकडे वाटचाल करणारी गौरवशाली परंपरा लाभलेली ही संस्था आहे. या संस्थेच्या विकासामध्ये परमश्रद्धेय , राष्ट्रसंत , जैनधर्मदिवाकर , ज्ञानमहोदधि , आचार्यसम्राट पूज्य गुरुदेव १००८ श्री आनंदऋषिजी म.सा. यांचे कृपाशीर्वाद, मौलिक मार्गदर्शन लाभलेले आहे . पूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादानेच ही संस्था आज यशाच्या शिखरावर विराजमान आहे.
१९२० साली प. पू. रत्नऋषिजी म. सा. चातुर्मास संपवून पाथर्डीला आले त्यावेळी या ठिकाणची शैक्षणिक परिस्थिती खूप बिकट होती . शिक्षणाच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या , तेव्हा समाज शिकला पाहीजे तरच उत्कर्ष होईल अशी भावना ते आपल्या प्रवचनातून व्यक्त करत असत.या त्यांच्या प्रवचनाचा कै. मोतीलालजी गुगळे , कै. उत्तमचंदजी मुथ्था यांच्या मनावर खोल परिणाम झाला . त्यांना कै.मगनमलजी गांधी, कै.चुनीलालजी कोटेचा व इतर सहकारी यांची साथ मिळाली त्या सर्वांची एक सभा झाली.या सभेत सर्वानुमते निर्णय घेतला की समाजबांधवाकडून १ आण्यापासून १ रुपयापर्यंत देणगी जमा करून पाच वर्षात शाळा स्थापन करु. तो भाग्यवान दिवस होता माघ शु. संवत १९७७ दि. २१/२/१९२१. ही सर्व मंडळी झपाटयाने कामाला लागली . पाच वर्षाचे काम दोन वर्षातच पूर्ण झाले व १९२३ जैन ज्ञान फंड नावाने संस्थेची स्थापना झाली . केवळ ९ विद्यार्थ्यांवर सुरु झालेल्या या शैक्षणिक संकुलात आज हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत . लहान रोपटयाचे आज विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे . श्री गोविंदराव सीताराम वराडे यांना प्रथम मुख्याध्यापक म्हणून नेमण्यात आले . संस्थेचे प्रथम अध्यक्ष म्हणून कै. मोतीलालजी गुगळे , तर प्रथम सचिव म्हणून उत्तमचंदजी मुथ्था यांनी काम पाहीले. या शिवाय भिकनचंदजी चुनीलालजी कोटेचा ,सुरजमलजी सुखलालजी कोटेचा, मगनमलजी गांधी यांनी संस्थेस बहुमोल मदत करून आपले नाव चिरंतन केले आहे . संस्थेतील विविध शाखांची विद्यार्थी संख्या वाढू लागली . विद्यार्थ्यांची निवासी सोय व्हावी म्हणून वसतीगृहाची स्थापना करण्यात आली , १९२७ साली वसतीगृहातील विद्यार्थी संख्या १०५ होती . यावरून आपण संस्थेच्या भरभराटीचा अंदाज लावू शकतो . २१ / १२ / १९२६ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी ए . एम. मेकमिलन यांनी संस्थेस भेट देऊन गौरव उदगार काढले . संस्था नावारुपास येवू लागली . १९३५ साली ट्रस्ट रजिस्टर्ड करण्यात आला . कै. कुंदनमलजी फिरोदिया , उत्तमचंदजी बोगावत, मोतीलालजी गुगळे , उत्तमचंदजी मुथ्था , सुखलालजी कोटेचा यांना ट्रस्टी म्हणून नेमण्यात आले. कार्यकारी मंडळ २३ सदस्यांचे झाले.
पाठशाळेचे हायस्कूलमध्ये रूपांतर करण्याचा व शालेय शिक्षणासोबतच धार्मिक शिक्षण विशारद पर्यंत देण्याचा निश्चय केला तसेच विद्यार्थी स्वावलंबी व्हावेत म्हणून उद्योग मंदिर काढून व्यवसाय शिक्षण देण्याचा विचार संस्थाचालकांनी केला . दानशूर श्रीमान मगनमलजी गांधी व मोतीलालजी गुगळे यांनी शाळा व बोर्डींगचा समावेश होवू शकेल अशी भव्य इमारत संस्थेच्या हयातीपर्यंत दान दिली. गोर ,गरीब, अनाथ मुलांना शिक्षण देणे हे ब्रीद मनी धरून ही संस्था आजही निरंतरपणे आपल्या ध्येयावर एकनिष्ठ राहून वाटचाल करत आहे .
आज संस्थेचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योगपती मा. श्री. अभयजी फिरोदिया हे काम पाहत असून सचिव पदाची धुरा मा. श्री. सतिशजी गुगळे हे पाहत आहेत . आज संस्थेमार्फत केजी पासून पीजी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे . संस्थेच्या पाथर्डी , माणिकदौंडी , श्री क्षेत्र चिचोंडी या ठिकाणी शाखा असून संस्थेमार्फत सायन्स कॉलेज , फार्मसी कॉलेज , हायस्कूल , ज्युनिअर कॉलेज , नीट , जेईई, सीईटी मार्गदर्शन वर्ग , इंग्लिश मेडीयम , आश्रमशाळा आदींचे संचलन केले जात आहे. सर्वच संस्थाचालकांच्या शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी धोरणामुळे संस्था आज यशाच्या सर्वोच्च शिखरावर असून ग्रामीण भागासाठी तर ही शिक्षण क्षेत्रात संजीवनीचे कार्य करतेय. या संस्थेतील हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर विराजमान आहेत ही संस्थेच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह बाब असून लवकरच संस्थेचा शताब्दी सोहळा येतो आहे . याचा सर्वांनाच अत्यानंद होत आहे. अशा प्रकारे ही संस्था भविष्यात पूज्य गुरुदेव , आचार्य सम्राट , प. पू. श्री. आनंदऋषिजी म. सा. यांच्या आशीर्वादाने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करेल यात तिळमात्र शंका नाही .
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.