Testimonials



श्री. सी. डी. फकीर

(माजी मुख्य अभियंता (भारत सरकार ) ) Alumnus 1961-1965

श्री तिलोक जैन विद्यालय ही माझी शाळा, सन 1961 ते 1965 या चार वर्षात आठवी ते अकरावी पर्यंत चे शिक्षण घेत असतांना दररोज प्रभू पिंपरी ते पाथर्डी असा 22 कि.मी. अनवाणी पायी प्रवास आजही आठवतो. पीटीचा बूट जास्त टिकावा म्हणून तो पिशवीत ठेऊन अनवाणी जाणे हे नित्याचेच. चिखलातून चालतांना पायात काटे रुतणे , कालांतराने पायात कुरूप होणे , पावसाळ्यात चिखलात सायकल फसली तर तेथेच सोडून घरी जाणे आणि दुसऱ्या दिवशी सायकल ठीक ठाक करून शाळा गाठणे या सारख्या आठवणीमुळे मला आजही माझी शाळा आठवते . रस्त्यावर चालतांना चिंतनाद्वारे केलेला अभ्यास वेळेचा सदुपयोग शिकवून गेला. त्याकाळी फार पाऊस झाल्याने गावाकडे जाता येत नसे अशा वेळी उर्दू शाळेच्या वरहंड्यात मी राहत असे,अशा वेळी धरमचंद खाबिया माझ्या साठी तांब्यात बोर्डिंग मधून जेवण आणत असत. दरवर्षी 8 ते 11 वी पर्यंत मी शाळेत पहिल्या नंबर ने पास होत असे ,आणि त्यामुळे मला दरवर्षी 4 ते 5 रुपये बक्षीस मिळे.11 वी त पहिल्या क्रमांक मिळाला आणि राज्याच्या मेरिट लिस्ट मध्ये आल्यामुळे मला नॅशनल स्कॉलरशिप मिळाली , सुभाष खाबिया यांनी लिहिलेला लेख ज्ञान दीप या मासिकात छापून आला, दरवर्षी पहिल्या नंबर ने पास झालो की वडील मला गोंजारत आणि आशीर्वाद देतअसत , माझ्या साठी तो स्पर्श प्रेरणादायी ठरला. संस्कृत हा माझा आवडीचा विषय होता तरीही गुरुजनांच्या सांगण्यावरून मी अंकगणित विषय घेऊन 97 मार्क्स मिळवले , माझ्या आयुष्यात धरमचंद आणि मलंग यांचे पाठबळ अविस्मरणीय आहे. पुढे मी बी. ई.(सिव्हिल) आणि एम. ई (स्ट्रक्चर) केले.1973 साली M.P.S.C परीक्षा पास झालो आणि सा. बां. विभागात क्लास वन अधिकारी म्हणून रुजू झालो आणि मुख्य अभियंता पर्यंत पोहचलो. प्रशासनात राहून तळागाळातील माणसं कामाच्या माध्यमातून जोडली. अनवाणी पायी केलेला प्रवास आठवत राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रे पक्क्या रस्त्यांनी जोडले.कामाच्या विशिष्ट शैलीमुळे तत्कालीन नेते , मंत्री प्रसंगी मुख्यमंत्री सुद्धा कौतुक करत.मी किल्लारी भूकंप पुनवर्सन , 2001 चा गुजरात भूकंप ,2004 च्या पोंडेचरी -केरळ त्सुनामी , तारापूर थर्मल पॉवर स्टेशन आणि राज्यातील पूर परिस्थिती सारख्या कामामध्ये ठसा उमटवला. सेवानिवृत्ती नंतरही शासनाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या प्रमुख पदी माझी नेमणूक केली, संधी चे सोने करत दुर्गम आदिवासी भागातील रस्ते करत अनेक गावे जोडली आणि महाराष्ट्र राज्य रस्ताच्या बाबतीत भारतात अग्रेसर ठरले ,जीवन कार्याची दखल घेत 2010-11 चा बाबा आमटे जीवन गौरव सन्मान हा राष्ट्रीय सन्मान मला मिळाला. 2012-13 साली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेवर पुन्हा देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली, संपूर्ण देशात कामानिमित्ताने फिरत असतांना सुद्धा " घार हिंडे आकाशी ..." या कवितेप्रमाणे माझे चित्त सदैव पाथर्डी कडे असे.अत्यंत सामान्य कुटुंबातील ,प्रतिकूल परिस्थिती तून पुढे जाताना मला मिळालेले शालेय जीवनातील अनुभव माझ्या आयुष्यात दीपस्तंभ ठरले. श्री चंदनमलजी गांधी , सुगनशेठ कुचेरीया , मोतीलालजी गुगळे किंवा आताच्या पिढीचे श्री चंपालालजी गांधी , सुरेशलालजी कुचेरीया व सतिशलालजी गुगळे यांना मी साध्या वेशातील खरेखुरे संत मानतो, कारण त्यांनी दुष्काळी भागात शैक्षणिक बदल घडवून आणला, अनेक रानफुले फुलवली त्याचा सुगंध आज राज्यात, राज्याबाहेर आणि जगात सुद्धा दरवळत आहे. माझी शाळा वेबसाईटच्या माध्यमातून देशपातळीवर झळकणार याचा मनस्वी आनंद होत आहे. संस्थेच्या आणि विदयालयाच्या प्रगतीला शुभेच्छा प्रदान करतो.धन्यवाद.

Back to Testimonials

Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.