Testimonials



धीरज गुगळे

(डेप्युटी कॅन्ट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट,मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स,पुणे ) Alumnus 2001

शाळा म्हणजे जीवनाला दिशा देणारा एक महागुरु ,विद्येचे माहेरघर आणि शाळेतील सर्व गुरुजन म्हणजे मार्गदर्शक दीपस्तंभ. या सर्वांच्या जडणघडणीतून पाथर्डी मधील श्री तिलोक जैन विद्यालयात पाचवी ते दहावी चे शिक्षण घेत,मिळालेल्या आदर्श संस्कारांच्या बळावर आज मला आयुष्यात मोठे यश लाभले आहे.आई वडील हे आपले प्रथम गुरू तर शाळा तेथील शिक्षक वृंद हे दुसरे गुरू.शाळेमुळे आपले आयुष्य घडत असते. या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज बीई,मॅकेनिकल इंजिनीअरिंग,बिट्स,पिलानी चे उच्च शिक्षण घेत व यूपीएससी सारखी क्लिष्ठ परीक्षा उत्तीर्ण होत मला भारतीय लष्करी सेवेत आयडीएएस अधिकारी पदापर्यंत मजल गाठता आली. शाळेत असताना मी शिक्षकांना नेहमी विज्ञान व गणिताबद्दलचे अभ्यासक्रमातील असो किंवा अभ्यासक्रमा बाहेरचे असो असंख्य प्रश्न विचारायचो आणि शिक्षकही माझ्या या प्रश्नांना कंटाळा न करता उत्तरे देत, माझ्या शंकांचे निरसन करत.मी शालेय जीवनात प्रज्ञा शोध,महराष्ट्र टॅलेंट सर्च अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेत असे. मला यावेळी माझ्या सर्व शिक्षकांचे प्रोत्साहन मिळे आणि यातूनच माझा आत्मविश्वास वाढीला लागला. या आत्मविश्वासाच्या जोरावरच मला शालेय जीवनात महाराष्ट्र टॅलेंट सर्च मध्ये राज्यात अठराव्या क्रमांकावर तसेच सातवीत स्कॉलरशिप मिळवता आली. पुढे मी आयआयटी,बिट्स सॅट,यूपीएससी सारख्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो. शाळेतील माझ्या मित्रांसोबतच्या आठवणी तर कधीच न विसरता येण्या सारख्या आहेत. त्यांच्या सोबत रोज खेळले जाणारे वेगवेगळे मैदानी खेळ,विविध उपक्रमांतील सहभाग, शाळेतील त्यांच्या सोबतची धिंगामस्ती,सहली यातूनही मला बरेच काही शिकायला मिळाले.शाळेत मिळालेल्या या संस्कार व बाळकडू मुळे शालेय जीवनानंतर मला उत्तम क्रिकेट खेळण्याबरोबरच माझा पर्यावरण रक्षण व निसर्गसंवर्धनाचा छंद जोपासता आला आहे. एकंदरच शाळेने मला नुसते पाठ्यपुस्तकी ज्ञान दिले नाही तर या स्पर्धेच्या युगात आनंदाने,आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगायला शिकवले.या शाळेमुळेच माझी पुढील वाटचाल सुकर झाली. या शाळेचे हे ऋण खरेतर शब्दात व्यक्त करता येण्यासारखे नाही. तरीही शाळेप्रती तेथील शिक्षकवृंदा प्रति मी या दोन ओळी व्यक्त करतो " ज्ञानदायी माऊली गे हो सदा यशवंत तू,इंद्रचापा लाजविते ज्ञानशोभा येथली,शारदेचा वास येथे दिव्य वाणी ऐकतो प्राशुनी ज्ञानामृता मी धन्य माते मानितो".

Back to Testimonials

Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.