Testimonials



श्री. बबनरावजी ढाकणे

(माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री (भारत सरकार)) Alumnus 1952-1953

इंग्रजांच्या काळात आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेले श्री तिलोक जैन विद्यालय हे तालुक्यातील माध्यमिक शिक्षण देणारे एकमेव विद्यालय . मी या विद्यालयात येण्यापूर्वी अकोले सारख्या दुष्काळी आणि डोंगराळ भागात जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळेत चौथी पर्यंत आणि त्यानंतर सातवी पर्यंतचे शिक्षण पाथर्डीत मराठी शाळेत घेतले. हिंद वसतिगृहात राहून पुढे आठवी साठी 1952-53 साली श्री तिलोक जैन विद्यालयात प्रवेश घेतला. आदरणीय मेहंदळे सर आणि निर्मालाताई मेहेंदळे हे उत्तम शिक्षक मला लाभले, ते अतिशय कडक शिस्त असणारे पण प्रभावी शिकवणारे . गोडबोले सर ,भालेराव सर त्या काळी जीव ओतून शिकवणारे .ही त्या काळची तालुक्यातील एकमेव शाळा ,ज्या शाळेत मराठवाडयातील म्हणजे त्यावेळच्या निजाम स्टेट मधील खूप मूल असायची .हिंद वसतिगृहात राहत असल्याने वर्तमानपत्र वाचून पंडित जवाहरलाल नेहरू , काकासाहेब गाडगीळ , सानेगुरुजी यांच्या विचारांचा खूप प्रभाव माझ्या विद्यार्थी मनावर पडला. 1951 साली सहावीत असतांना , वसतिगृहातील एक तक्रार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे करण्याची हिम्मत मला या मातीतून मिळाली , मेहेंदळे सर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत आणि तो विषय माझा इतर विषयांपेक्षा जास्त आवडीचा असल्याने मी तेव्हा पासूनच मोर्चा , आंदोलनात भाषण करत असे . माझा मुळातच बंडखोर स्वभाव असल्याने विद्यार्थी दशेत असतांना स्वातंत्र्य सैनिक माधवराव नि-हाळी , राष्ट्र सेवादल यांच्या विचारसरणीचा प्रभाव वाढत गेला . मुळातच अंगात चळवळ भिनलेली असल्याने नववीत असताना गोवा मुक्ती संग्रामात अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा सत्याग्रही म्हणून मी सहभागी झालो . नववी पर्यंत शिक्षण असतांना गावचा सरपंच ते केंद्रीय ऊर्जा मंत्री (भारत सरकार)अशा पदापर्यंत मजल मारली.माझ्या जीवन प्रवासात शालेय अनुभव अनेक अनुभूती देऊन गेले. काळाची पावले ओळखून शिक्षणाची सोय करणारे श्री बाबूशेठ मुथ्या, श्री चुनीलाल गुगळे , श्री भाऊसाहेब फिरोदिया ,श्री.चंदनशेठ गांधी हे खरे कर्मयोगी. त्यांनी निस्वार्थी भावनेतून स्थापन केलेल्या श्री तिलोक जैन विद्यालयामुळे हजारो चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडले आणि घडत आहेत ही अभिमानाची बाब आहे. विद्यालयाच्या प्रगतीला मन:पूर्वक शुभेच्छा....

Back to Testimonials

Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.